Dal Bafla Churma (दाल बाफले चुरमा ) – A Rajasthani Specialty
Dal Bafla Churma is a specialty of Rajasthan as well as Madhya Pradesh. Recipes are different but both versions taste awesome. Bafla is different than Bati. Bati is roasted in Oven or on a Griddle whereas Bafla is cooked in water and then deep fried in Ghee. While making Dal Bafla Churma one should not compromise on the amount of Ghee used in the recipe. Also such dishes are cooked once in a while so having Ghee generously is okay. This is the Rajasthani version of the recipe where Split Green Gram with husk (Chhilakewali Moong Dal) is used for making Dal. All other ingredients are commonly available in Indian kitchen. This is a meal in itself. So one need not cook anything else with this. It’s a lengthy recipe but the taste is worth all the efforts and time one spends cooking this.
Ingredients (Serves 3-4) (1 cup = 250 ml)
For Dal
Split Green Gram with Husk ( Chhilakewali Moong Dal) ½ cup
Split Pigeon Peas (Chana Dal) 1 tablespoon
Turmeric Powder 1 teaspoon
Ghee 2 tablespoon
Garlic cloves 8-10 finely chopped
Asafoetida ¼ teaspoon
Cumin Seeds ½ teaspoon
Ginger 1 inch finely chopped
Green Chilies 2 finely chopped
Onion 1 medium – finely chopped
Tomato 1 medium – finely chopped
Kashmiri Chili Powder 1 teaspoon
Coriander Powder 1 teaspoon
Chopped Coriander 2 tablespoon
Garam Masala ¼ teaspoon
Salt to taste
For Bafla
Coarse Whole Wheat Flour 2 cup
Salt ½ teaspoon
Coriander seeds roughly crushed ½ teaspoon
Carom seeds ¼ teaspoon roughly crushed
Ghee 4 tablespoon (at room temperature)
Baking soda 1 pinch
Ghee for Deep frying
For Churma
Cardamom Powder ¼ teaspoon
Dry fruit pieces 2 teaspoon
Powdered sugar about ¼ cup (adjust as per paste)
Ghee 2 tablespoon
Instructions
For Dal
1. Wash and Soak both Grams (Dal) together for 30 minutes.
2. Add enough water, ½ teaspoon Turmeric Powder. Let mixture boil. Reduce flame to medium and cook covered till Dal is cooked.
3. Add Salt and Roughly Blend the mixture with a spoon.
4. Heat Ghee. Add garlic pieces. Saute till golden brown. Add Asafoetida, Cumin seeds. Wait for splutter. Add Green chilies and Ginger. Saute.
5. Add Onions. Saute till translucent. Add Tomatoes. Saute for 2-3 minutes. Add Kashmiri red chili powder, ½ teaspoon Turmeric Powder, Coriander Powder, and little Salt. Cook till Tomatoes are soft.
6. Add Cooked Dal. Add little water. Boil the mixture. This Dal is thick.
7. Add Garam Masala, chopped Coriander and Mix. Tasty Dal is ready.
For Bafla
1. Mix all ingredients except the Ghee for Deep frying. Press down a handful of flour in your palm. It should hold or form the shape. If it does, it means that right amount of ghee is added.
2. Add Warm water and bind a stiff consistency dough. Keep covered for 10-15 minutes.
3. Add 2 litre water in a big pan and boil.
4. Knead dough and make big lemon size balls of the dough – about 12-14. Make a ditch in the centre using a finger.
5. Add Bafle in boiling water. Cook on medium flame. Bafle will sink in water. After some time Bafle start floating in the water. Cook for another 10 minutes. Cooked Bafle will light and There will be small dots on the surface. Take Bafle out in a plate and allow to cool.
6. Cut each Bafla into 2 halves.
7. Heat Ghee in a wok. Deep fry in Ghee on medium till light brown. Take out in a plate. Tasty, Crispy Bafle are ready.
For Churma
1. Upon cooling crumble 4-5 Bafle. Grind in a grinder into a fine powder.
2. Add 2 tablespoon Ghee in a wok. Add Ground Bafle and saute for 5 minutes (till light brown). Take it out to a bowl and cool.
3. Add Cardamom Powder, Dry fruit pieces.
4. Upon cooling add powdered sugar and mix.
5. Delicious Churma is ready.
While eating roughly crumble Bafle in a plate. Pour Dal on the top. Add some Ghee if you like. Relish Delicious Dal Bafle with Churma.
==================================================================================
दाल बाफले चुरमा
दाल बाफले चुरमा ही राजस्थान आणि मध्य प्रदेशची खासियत आहे. दोन्ही रेसिपीत थोडा फरक आहे पण दोन्ही प्रकार स्वादिष्ट लागतात. बाफले हे बाटीपेक्षा वेगळे असतात. बाटी ओव्हनमध्ये किंवा तव्यावर भाजतात तर बाफले आधी पाण्यात शिजवून मग तुपात तळतात. ही रेसिपी करताना साजूक तूप किती वापरतो ते पाहायचं नाही. तसंही हा पदार्थ आपण वर्षातून एक– दोनदा करणार मग करायचं ते सगळे शिस्तीत करायचं – तुपाची काटकसर न करता.
एक जुना किस्सा आठवला. आम्ही उज्जैन मध्ये एका धाब्यावर ही डिश खायला गेलो होतो. दुकानदाराने विचारले ‘कितना किलो?’. आम्ही म्हटलं ३ प्लेट. तो म्हणाला ‘वो ठीक है ! लेकिन बटर कितना किलो?’. आम्ही बुचकळ्यात !!! मग त्याला कळलं हे परप्रांतीय आहेत. त्याने समजावले ‘२ प्लेट मे बटर कितना चाहिये? उसके हिसाबसे प्लेट का रेट होता आहे‘. आम्ही भीतभीत सांगितलं १०० ग्राम बटर!! आमची धाव तेव्हढीच …. त्याने मग ३ प्लेटमध्ये दाल बाफले चुरमा घालून त्यावर १०० ग्राम बटर घालून दिलं!! तर हा पदार्थ असा खायचा असतो…
ही राजस्थानी रेसिपि आहे ज्यात डाळीसाठी सालीची मुगाची डाळ वापरली आहे. बाफले साठी रवाळ कणिक लागते. बाकी सारे जिन्नस आपल्या घरात नेहमी असणारे आहेत. रेसिपी वेळखाऊ आहे पण हे पूर्ण जेवणच असतं. त्यामुळे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे पदार्थ करण्यात जो वेळ घातला तो सार्थकी लागतो.
साहित्य (३–४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
डाळीसाठी
सालीची मूग डाळ अर्धा कप
चणाडाळ १ टेबलस्पून
हळद १ टीस्पून
साजूक तूप २ टेबलस्पून
लसूण ८–१० पाकळ्या बारीक चिरून
हिंग पाव टीस्पून
जिरं अर्धा टीस्पून
आलं १ इंच बारीक चिरून
हिरव्या मिरच्या २ बारीक चिरून
कांदा १ मध्यम – बारीक चिरून
टोमॅटो १ मध्यम – बारीक चिरून
काश्मिरी लाल तिखट १ टीस्पून
धने पूड १ टीस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
गरम मसाला पाव टीस्पून
मीठ चवीनुसार
बाफले साठी
जाडसर कणिक २ कप
मीठ अर्धा टीस्पून
धने जाडसर कुटून अर्धा टीस्पून
ओवा पाव टीस्पून
साजूक तूप ४ टेबलस्पून (सामान्य तापमानात ठेवलेलं)
बेकिंग सोडा १ चिमूट
तूप तळण्यासाठी
चुरम्यासाठी
वेलची पूड पाव टीस्पून
सुक्या मेव्याचे तुकडे २ टेबलस्पून
पिठीसाखर अंदाजे पाव कप (चवीनुसार कमी / जास्त करा)
साजूक तूप २ टेबलस्पून
कृती
डाळीची कृती
१. दोन्ही डाळी एकत्र धुवून ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा.
२. एका मोठ्या पातेल्यात पुरेसं पाणी घालून त्यात डाळी घाला; अर्धा टीस्पून हळद घाला. मिश्रणाला उकळी आली की गॅस बारीक करून पातेल्यावर झाकण ठेवून डाळी शिजवून घ्या.
३. पातेल्यात मीठ घाला आणि मिश्रण रवीने / डावाने घुसळून एकजीव करून घ्या.
४. दुसऱ्या पातेल्यात साजूक तूप गरम करून त्यात लसणीचे तुकडे गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात हिंग, जिरं घाला. जिरं तडतडलं की हिरवी मिरची आणि आलं घाला. मिश्रण परतून घ्या.
५. कांदा घालून पारदर्शक होईपर्यंत परता. टोमॅटो घालून २–३ मिनिटं परता. काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, धने पूड आणि थोडं मीठ घाला (आपण डाळीत मीठ घातलंय ते लक्षात ठेवा). टोमॅटो नरम होईपर्यंत मिश्रण शिजवा.
६. शिजलेल्या डाळी घाला. थोडं पाणी घालून मिश्रण उकळून घ्या. ही डाळ दाट असते.
७. गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. चवदार डाळ तयार आहे.
बाफलेची कृती
१. तळणीचे तूप वगळून सर्व साहित्य एका परातीत एकत्र करा. हाताने एकजीव करून घ्या. थोडं पीठ मुठीत घेऊन मूठ दाबून बंद करा. पिठाचा मुठीचा आकार तसाच राहिला तर मोहन बरोबर आहे असं समजावं. नाहीतर अजून थोडं मोहन घालावं.
२. थोडं थोडं कोमट पाणी घालून घट्ट पीठ भिजवा. १०–१५ मिनिटं झाकून ठेवा.
३. एका मोठ्या पातेल्यात २ लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवा.
४. पीठ ३–४ मिनिटं मळून घ्या आणि मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा – १२–१४ गोळे होतील. प्रत्येक गोळ्याला हाताच्या बोटाने एक खाच करून घ्या.
५. तयार गोळे (बाफले) उकळत्या पाण्यात सोडा. गॅस मध्यम करा. सुरुवातीला बाफले पातेल्याच्या तळाशी जातील. शिजल्यावर बाफले पाण्यात तरंगताना दिसतील. सर्व बाफले पाण्यात तरंगायला लागले की आणखी १० मिनिटं शिजवा. शिजलेले बाफले हलके होतात आणि त्यावर छोटे छोटे ठिपके दिसतात. शिजलेले बाफले एका ताटलीत काढून गार करून घ्या.
६. प्रत्येक बाफल्याचे दोन तुकडे करा.
७. एका कढईत तूप गरम करून बाफल्याचे तुकडे मध्यम आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. खमंग खुसखशीत बाफले तयार आहेत.
चुरम्याची कृती
१. बाफल्याचे तळलेले तुकडे गार झाले की ८–१० तुकडे हाताने कुस्करून घ्या. मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.
२. एका कढईत २ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात वाटलेले बाफले घालून मंद आचेवर हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्या. एका वाडग्यात काढून थंड करून घ्या.
३. वेलची पूड आणि सुक्या मेव्याचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करा.
४. मिश्रण पूर्ण गार झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून एकजीव करा. स्वादिष्ट चुरमा तयार आहे.
खाताना बाफले हाताने चुरडून त्यावर डाळ घाला. आवडत असल्यास थोडं साजूक तूप घाला. चवदार डाळ बाफले आणि चुरम्याचा आस्वाद घ्या.
Your comments / feedback will help improve the recipes